नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चौकीदार चोर हैं असे वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे. न्यायालयाने राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी 22 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे
.
काही दिवसांपूर्वी राफेल विमान खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका देत, पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पत्रकारांसमोर म्हटले होते की, कोर्टानेही ‘चौकीदार चोर है’ असे सांगितले आहे. ‘चौकीदार चोर है’, हे आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. राफेल प्रकरणात दोन लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. एक व्यक्ती नरेंद्र मोदी आहे तर दुसरी व्यक्ती अनिल अंबानी असल्याचे राहुल म्हणाले होते.
त्यानंतर राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी, कोर्टाने जे म्हटलेले नाही तेच कोर्टाच्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करून, न्यायालयाचा अवमान केला असल्याची तक्रार करत भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने राहुल यांना नोटीस बजावली. राफेल प्रकरणात न्यायालयानें पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कोणतेही मतप्रदर्शन केलेले नाही. राहुल गांधींनी त्याचा विपर्यास केला आहे, असे खंडपीठाने यावेळी नमूद केले.